1171 उमेदवार चिन्हांसह ईव्हीएममध्ये सीलबंद ! 15 तारखेला भाग्य होणार सील, 18 ला फैसला!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या 446 जागांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. या मतदानाचा महत्त्वाचा टप्पा असलेली मतदान यंत्रे सील करण्याची प्रक्रिया आज, 9 जानेवारीला पार पडली. यावेळी रिंगणातील 1171 उमेदवार त्यांच्या चिन्हासह ईव्हीएममध्ये सील झाले असून, त्यांचे भाग्य मतदानाअंती या मशीनमध्ये बंदिस्त होणार आहे. त्यांच्या भाग्याचा फैसला 18 जानेवारीला होणार्या मोजणी अंती होणार आहे.
तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार व अन्य कर्मचार्यांनी आज ईव्हीएम सिलिंगची किचकट प्रक्रिया पार पाडली. तालुक्यातील 221 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 235 ब्यालेट युनिट व 221 कंट्रोल युनिट लागणार असल्याचे तहसीलदार खंडारे यांनी सांगितले. आज मतदान यंत्रांत विविध प्रवर्गातील 1171 उमेदवारांची नावे व त्यांची चिन्हे टाकण्यात आल्यावर यंत्रे सील करण्यात आली. आता ही यंत्रे प्रत्यक्ष मतदानासाठी तयार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. या सिलिंगसाठी 52 नियमित व 8 राखीव कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. नायब तहसीलदार मंजुषा नेताम, अमरसिंह पवार, श्रीमती गौर, लक्ष्मण भामळे यांच्यासह विजय टेकाळे, नितीन पाटील, अविनाश गोसावी, अतुल झगरे, समाधान जाधव आदींनी तहसीलदारांच्या मार्गदर्शनात यासाठीचे नियोजन केले.