“राष्ट्रवादी’वरही घोंगावतंय “गुलाब’! पक्ष संघटनेत लवकरच मोठे फेरबदल; निष्क्रिय, शोबाज पदाधिकाऱ्यांना मिळणार डच्चू!! “सायबांचा’ ग्रीन सिग्नल; नवा युवाध्यक्ष देखील निवडणार

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात थैमान उडविल्यावर गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरला असला तरी आता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच “राजकीय गुलाब’ घोंगावणार हाय! या वादळात जिल्ह्याभरातील निष्क्रिय, शोबाज, अकार्यक्षम पदाधिकारी भिरकावले जाणार असून, त्यांच्या हाती नारळ देण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीपूर्वी अनेक ताज्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या हाती पक्षाची धुरा असणार …
 
“राष्ट्रवादी’वरही घोंगावतंय “गुलाब’! पक्ष संघटनेत लवकरच मोठे फेरबदल; निष्क्रिय, शोबाज पदाधिकाऱ्यांना मिळणार डच्चू!! “सायबांचा’ ग्रीन सिग्नल; नवा युवाध्यक्ष देखील निवडणार

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात थैमान उडविल्यावर गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरला असला तरी आता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच “राजकीय गुलाब’ घोंगावणार हाय! या वादळात जिल्ह्याभरातील निष्क्रिय, शोबाज, अकार्यक्षम पदाधिकारी भिरकावले जाणार असून, त्यांच्या हाती नारळ देण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीपूर्वी अनेक ताज्‍या दमाच्या कार्यकर्त्यांच्या हाती पक्षाची धुरा असणार आहे. तसेच पक्षाला नवीन युवा आघाडी अध्यक्ष देखील मिळणार आहे.

पक्षाभोवती घोंगावणाऱ्या या वादळाचा केंद्रबिंदू बारामती असून, पश्चिम महाराष्ट्रातून घोंगावत येणारे हे वादळ लवकरच बुलडाणा जिल्ह्यात धडकणार आहे! पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा प्रभारी ना. राजेंद्र शिंगणे यांच्यासमवेत आठवड्यापूर्वीच बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादीच्या कामगिरीचा आढावा घेतला. अगदी जिल्हाध्यक्ष ते तालुका, शहर, विधानसभा अध्यक्ष, विविध आघाड्या, ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीची यावेळी झाडाझडती घेण्यात आली.

यापूर्वी पक्ष निरिक्षकांनी सादर केलेल्या अहवालावरसुद्धा विचारविनिमय करण्यात आला. या चर्चेअंती हे कठोर निर्णय घेण्यात आल्याचे मुंबईस्थित वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेतील सर्व पातळीवरील पदात लवकरच मोठे फेरबदल करण्याचे स्पष्ट संकेत या सूत्राने दिले. दरम्यान, जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी या घडामोडींना दुजोरा दिला असला तरी अधिक काही बोलण्यास विनम्र नकार दिला. पितृपक्ष संपल्यावर ६ ऑक्टोबरनंतर हे व्यापक बदल होण्याची शक्यता वर्तवून त्यांनी चर्चेला ब्रेक दिला.

युवा आघाडी अध्यक्षसाठी चुरस
जिल्ह्यातील युवक आघाडी बरखास्त करण्यात आली असून, सध्या शेखर बोंद्रे हे प्रभारी म्हणून काम पाहत आहे. युवक जिल्हाध्यक्षपदासाठी नुकतेच प्रदेशाध्यक्ष शेख आणि कार्याध्यक्ष वरपे यांच्या उपस्थितीत बुलडाणा येथील राष्ट्रवादी भवनात (जिल्हा कार्यालयात) मुलाखती घेण्यात आल्या. या पदासाठी चुरस असल्याचे चित्र आहे. अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा प्रभारी तथा राष्ट्रवादीचेही “पालक’ राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी फेरबदल करण्यासंबंधी कोणती कार्यपद्धती अवलंबवितात, याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.