शंभरीच्या उंबरठ्यावरील आजींनी मतदान करून तरुण मतदारांना लाजवले! बजावला पवित्र हक्क
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एरवी राजकारण व राजकारणी यांच्यावर (परिस्थिती व वेळेनुसार) हाती कप वा प्याला घेऊन खालच्या पातळीवर टीका करायची. खासगीत शिविगाळ करायची, विकास झाला नाही म्हणून बोंब मारायची अन् मतदानाची सुटी मिळते म्हणून तो पिकनिक डे म्हणून एन्जॉय करायचा अशी बहुतेक युवा मतदारांची तर्हा! अशा सर्व वयोगटातील बेजबाबदार मतदारांना लोणार तालुक्यातील 2 शंभरीच्या उंबरठ्यावरील आजीबाईंनी मतदान करून सणसणीत चपराक लगावली!
लोणार तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज 15 जानेवारीला मतदान पार पडले. यामध्ये कोयाळी व खळेगाव ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर आलेल्या आजीबाईंचा मतदानाबद्दलचा उत्साह व राष्ट्रीय कर्तव्यावर असलेली निष्ठा पाहून मतदान केंद्रवरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारीच काय बंदोबस्तावरील पोलीस दादा, एजंट, अन्य मतदार देखील थक्क झाले! कोयाळा मतदान क्रमांक 2 ची पाहणी करण्यासाठी आलेले नायब तहसीलदार हेमंत पाटील, तलाठी भाकडे यांना देखील आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या ठिकाणी मतदानासाठी आलेल्या 93 वर्षीय शांताबाई मुळे यांना त्यांनी मनोमन सॅल्युट केला. लोणार तालुक्यातीलच खळेगाव मतदान केंद्रावर देखील असा सुखद चमत्कार घडला. तिथे तब्बल 95 वर्षीय वच्छलाबाई निवृत्ती नागरे यांनी मतदान करून निष्क्रिय मतदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.