ब्रेकिंग! 15 ग्रामपंचायत सदस्यांचे तडकाफडकी राजीनामे!!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींमधील एकेका जागेसाठी काट्याच्या लढती झाल्या असून, विजयासाठी उमेदवारांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र विजयी होऊनही तब्बल 15 सदस्यांनी राजीनामे, तेही तडकाफडकी देऊन टाकले, हे वाचून कुणालाही आश्चर्य वाटले असेल तर गैर काहीच नाही. पण हे राजीनामे त्यांनी स्वखुशीने दिले आहे, हे विशेष!
हे राजीनामे देणारे 10 तालुक्यांतील सदस्य साधेसुधे नसून गावात लोकप्रिय व निकाल लक्षात घेतले तर भाग्यशाली सुद्धा आहेत. याचे कारण जिथे एका जागेवर निवडून यायची सोय वा खात्री नाही, तिथे हे 15 जण चक्क 2 जागांवरून निवडून आले. आता नियमानुसार निकाल घोषित झाल्यावर वा तो नमुना डमध्ये प्रकाशित झाल्यावर 2 जागी विजयी झालेल्या सदस्याने 7 दिवसांत एका जागेचा राजीनामा देणे आवश्यक ठरते. यामुळे या 15 सदस्यांनी स्वखुशीने राजीनामे दिले आहेत. यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील पिंप्री आंधळे येथील 2 सदस्यांचा समावेश आहे. कल्याणसिंग परिहार व मनीषा गुमलाडु अशी त्यांची नावे आहेत. या मजेदार यादीत मुरादपूर (ता. चिखली) येथील अंजना जाधव, गुंधा (ता. लोणार) येथील रतिका फुके, उमरा (ता. मेहकर) येथील लता खंडारे, बोरी (ता. खामगाव) येथील विद्या टिकार यांचा समावेश आहे. खामगाव तालुक्यातील पिंप्री देशमुख येथील शेषराव गोरे यांनी कमाल करत ओपन व अनुसूचित जातीसाठी राखीव जागेतून एकाच वेळी निवडून येण्याची किमया केली. त्यांनी राखीव जागेचे (प्रभाग 3चे) सदस्यत्व ठेवणे पसंत केले. याशिवाय शेगाव तालुक्यातील डोलारखेडमधील वनिता काळे, वरुडमधील अर्चना भोजने, मलकापूरमधील चिखली रणथमच्या सोनाली पारधी नांदुरामधील अलमपूरच्या नंदा ठोंबे, जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर येथील सुलभा वाघमारे व शेरूकुमार गवई तर मोताळा तालुक्यातील वैशाली तायडे (सारोळापिर) व स्वप्नील गोगटे (आव्हा) हे देखील आपली गावातील लोकप्रियता सिद्ध झाल्यावर एका जागेचा राजीनामा देऊन मोकळे झाले आहेत!