फुंडकरांच्या लेखी खामगावच “जिल्हा’! निष्ठावान कार्यकर्त्यांसह नेतेही कंटाळले!! दीड वर्षे लोटूनही ज्युनिअर फुंडकरांची पक्षातील कामगिरी दखल घेण्यायोग्यही नाही!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः त्यांचा आवाका “आकाश’सारखा अमर्याद होता, कार्यक्षमता “सागर’सारखी अथांग होती, सर्वसामान्य कार्यकर्ते अन् जनता त्यांच्यात “पांडुरंग’ पहायची… संघ, जनसंघ ते भाजपला राज्यातील सर्वसामान्य आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यात जीवाचे रान केले, भाजपला आजचे दिवस दाखविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला… हे वर्णन आहे स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर …
 
फुंडकरांच्या लेखी खामगावच “जिल्हा’! निष्ठावान कार्यकर्त्यांसह नेतेही कंटाळले!! दीड वर्षे लोटूनही ज्युनिअर फुंडकरांची पक्षातील कामगिरी दखल घेण्यायोग्यही नाही!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः त्यांचा आवाका “आकाश’सारखा अमर्याद होता, कार्यक्षमता “सागर’सारखी अथांग होती, सर्वसामान्य कार्यकर्ते अन्‌ जनता त्यांच्यात “पांडुरंग’ पहायची… संघ, जनसंघ ते भाजपला राज्यातील सर्वसामान्य आणि तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यात जीवाचे रान केले, भाजपला आजचे दिवस दाखविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला… हे वर्णन आहे स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचे. ते आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गेल्यावर पक्षाची वाटचाल एका वेगळ्याच दिशेने सुरू झाली. त्यांचा वारसा चालवणारे आकाश फुंडकर हे त्याच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र त्यांचा जिल्हा म्हणजे केवळ आणि केवळ खामगाव (मतदारसंघ) आहे की काय असे वाटायला लागले आहे. ही भावना केवळ भाऊसाहेबांच्या चाहत्यांचीच नव्हे तर भाजपमधील दिग्गज नेते, पदाधिकारी अन्‌ सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपच्या सच्च्या, निष्ठावंत हजारो कार्यकर्त्यांची आहे. शिस्तबद्ध आणि इतरांपेक्षा हटके पक्ष असल्याचा दावा लक्षात घेतला तर ही मंडळी उघडपणे काही बोलून दाखवत नाही असे म्हणता येईल. (किंबहुना बोलणाऱ्यांचे काय हाल होतात हे अनुभवल्याने कोणी काही बोलत नाही.)

अध्यक्ष पदाचा चार्ज सांभाळून दीडेक वर्षाचा कालावधी झाल्यावर ज्युनिअर फुंडकरांनी काय कामगिरी बजावली याचे उत्तर फारसे आशादायी नाही, हे कट्टर भाजपाई खासगीत कबूल करतात. जिल्हाध्यक्ष खामगाव पलीकडे विचार (आणि ठोस सर्जिकल कृती) करायला तयारच नाही की काय अशी स्थिती आहे. यामुळे मुळात त्यांनी हे पद मनापासून स्वीकारले होते काय? अशी दुसरी शंका सामोरे येते. माजी मंत्री संजय कुटे यांच्यासारखा पक्षासाठी जीवाचे रान करणारा नेता आज कामामुळे खऱ्या अर्थाने मुंबईपर्यंत पोहोचला, राज्यस्तरीय नेता ठरला. चिखलीच्या आमदार श्वेता महाले आपल्या क्षमतेमुळे व आक्रमतेमुळे विरोधकांना पुरून उरल्या आहेत. मलकापुरात चैनसुख संचेती आहेत, पदाधिकारी अन्‌ लाखो कार्यकर्ते, चाहते आहेत. यामुळे सध्याही पक्ष नंबर वन वाटतो. एवढे सर्व असतानाही अध्यक्ष जिल्हा पिंजून काढायला, कमळ वाढवायला, जिल्ह्यात पक्षाचा झंझावात निर्माण करण्यात का धजावत नाही अन्‌ का पुढाकार घेत नाही हा यक्ष प्रश्न आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाही हीच स्थिती असेल तर मग आणखी कोणत्या मुहूर्ताची अध्यक्ष वाट पाहताहेत, असा निष्ठावंतांचा करडा सवाल आहे. मागच्या निवडणुकांत नरेंद्र मोदी नावाची त्सुनामी लाट होती, भाऊसाहेबांच्या पुण्याईच पाठबळ होते. त्यामुळे 2014 व 2019 असे दोनदा आमदार होण्याचे राजकीय भाग्य आकाश फुंडकरांना लाभले. याच बळावर मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती अन्‌ नगरपरिषदमध्ये यत्र तत्र सर्वत्र कमळ फुलले! मात्र आता तो स्वर्णमयी काळ संपलाय, लाट ओसरली आहे. आता महाविकास आघाडीविरुद्ध लढाई करायची आहे. खामगाव पलीकडे सुद्धा जिल्हा आहे. सिंदखेड राजा, मलकापूर, बुलडाणा, मेहकर या मतदारसंघांत पक्षाची हालत फारशी चांगली नाही. बूथ कमिट्या, युथ ब्रिगेड, गाव तिथे युवा मोर्चा या कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. सुमारे 500 जागांसाठी होणाऱ्या स्थानिक निवडणुकांची तयारी करण्यासाठीचे नियोजन करण्याचे भान अध्यक्षांनी ठेवणे कार्यकर्ते आणि जिल्हा भाजपला अपेक्षित आहे. राजकीय काळाची ती गरजही आहे. नाहीतर कामगिरी न दाखविणाऱ्यांचे काय हाल होतात (किंवा केले जातात हे) सर्वांनीच पाहिले आहे. यामुळे जिल्हाध्यक्षांनी तात्काळ चार्ज होणे काळाप्रमाणेच त्यांच्याही राजकारणाची गरज ठरली आहे.