नानांचा दौरा… ढिसाळ नियोजन, नियमांचा भंग!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जिल्हा दौरा ढिसाळ नियोजनामुळेच गाजला, अशी चर्चा कार्यकर्त्यांत होत आहे. काल, 9 जून रोजी दुपारी 4 वाजता मेहकर शहरात पोहोचणे अपेक्षित असताना ते दोन तास उशिराने पोहोचले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते ताटकळले. ठरलेला प्रत्येक कार्यक्रम पुढे अतिउशिराने होत गेला. चिखलीचा कार्यक्रम तर उत्तररात्रीपर्यंत रंगला. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जिल्हा दौरा ढिसाळ नियोजनामुळेच गाजला, अशी चर्चा कार्यकर्त्यांत होत आहे.

काल, 9 जून रोजी दुपारी 4 वाजता मेहकर शहरात पोहोचणे अपेक्षित असताना ते दोन तास उशिराने पोहोचले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी पदाधिकारी, कार्यकर्ते ताटकळले. ठरलेला प्रत्येक कार्यक्रम पुढे अतिउशिराने होत गेला. चिखलीचा कार्यक्रम तर उत्तररात्रीपर्यंत रंगला. त्यामुळे नानांना बुलडाण्यात पोहोचायलाही उशीरच झाला. सकाळी 11 वाजता खामगावसाठी निघायचे असताना बुलडाण्यातच 2 वाजले. त्यामुळे खामगावच्या कार्यकर्त्यांनाही त्यांची प्रतीक्षाच करावी लागली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन नानांनी केले. कोरोनावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले. मात्र कोरोना नियमांबाबत काँग्रेस कार्यकर्ते दक्ष दिसले नाहीत. विवाहाला 50 आणि अंत्यविधीला 20 लोकांची परवानगी मात्र नानांच्या दौऱ्यात शेकडो कार्यकर्ते नियमांचा भंग करताना दिसले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रपरिषद
नानांच्या दौऱ्यात त्यांनी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकार परिषद घेतली. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षसंघटनेसाठी आलेल्या नानांना जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय विषयावर पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

भाजपाचा विजय असो… स्वागतासाठी दिलेल्या घोषणेने नाना चक्रावले
बुलडाणा येथील कार्यक्रम आटोपून नाना खामगाव शहरात पोहोचले. त्‍याबरोबरच नानांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो…ही घोषणा ऐकल्यावर नानाही क्षणभर दचकलेच. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याच्‍या लक्षात चूक आल्यानंतर त्याने लगेच घोषणा बदलत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.