देऊळगाव राजा ः उद्या 15 तर परवा 11 ग्रामपंचायतींचे निवडणार कारभारी!
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील एकूण 48 ग्रामपंचायतींपैकी 26 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होऊन 18 जानेवारीला निकाल जाहीर झाला होता. तीन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा कारभारी कोण होणार, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे. उद्या, 11 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. यासाठी गावनिहाय निवडणूक निरीक्षक तहसील कार्यालयातून नियुक्त करण्यात आले आहेत.
उद्या अंढेरा, गिरोली खुर्द, पळसखेड झाल्टा, तुळजापूर, चिंचोली बुरुकुल, मंडपगाव, पिंपळगाव बुद्रूक, मेहुणा राजा, उंबरखेड, सावखेड नागरे, नागणगाव, पाडळी शिंदे, आळंद, पांगरी, डोंडा या पंधरा गावांच्या सरपंच पदाची निवड होणार असून, परवा 11 फेब्रुवारीला शिवणी आरमाळ, बायगाव बुद्रूक, देऊळगाव मही, जवळखेड, मेंडगाव, खल्याळ गव्हाण, पिंप्री आंधळे, टाकरखेड वायाळ, बोराखेडी बावरा, निमगाव गुरु, सावखेड भोई या 11 गावांचे सरपंच निवडले जाणार आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळगाव महीचे सरपंच पद कोणाला मिळते तसेच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे कोणाला गावकारभारी बनवतात, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील तीन- चार ग्रामपंचायती वगळता बाकीचे सर्व विजयी उमेदवार सहलीवर गेलेले आहेत. पॅनल प्रमुखाने कोणतीही दगाबाजी होऊ नये म्हणून त्यांना हवापालटासाठी नेले आहे.