काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जिल्ह्यात; स्वागताची जंगी तयारी, ‘असा’ आहे दौरा
बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या, 9 जूनला बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जिल्हा दौरा असल्याने स्वागताची जंगी तयारी जिल्हा समितीने केली आहे.
पटोले ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक व कोरोना कालावधीत त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणार आहेत. ते रिसोडवरून दुपारी 4 वाजता मेहकर येथे पोहोचणार असून, सुरुवातीला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन नंतर ते नेत्यांसोबत चर्चा करतील. तालुका व शहर काँग्रेस अध्यक्षांसोबत कोरोना काळात पक्षातर्फे केलेल्या कार्याचा आढावा घेणार आहे. तेथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी 5 वाजता चिखलीकडे रवाना होतील. सायंकाळी 5ः45 ला कोविड सेंटरला भेट देणार आहेत. त्यानंतर चिखली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. बुलडाणा येथे ते मुक्कामी थांबणार आहेत.
दुसऱ्या दिवशी 10 जून रोजी काँग्रेसच्या कार्यालयात बुलडाणा तालुका आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देणार आहेत. सकाळी 10ः30 वाजता पत्रकार परिषद घेणार असून, त्यानंतर सकाळी 11 वाजता बुलडाणा येथून खामगावकडे प्रयाण करतील. दुपारी 12 वाजता खामगाव येथील ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरला भेट देतील. नंतर तिथल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. दुपारी 1 वाजेदरम्यान शेगावकडे प्रयाण करणार आहेत. शेगाव येथे श्रींचे दर्शन घेऊन ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटरला भेट देत, तालुका व शहर अध्यक्ष यांच्याकडून कार्याचा आढावा घेतील दुपारी 3 अकोलाकडे प्रयाण करणार आहेत.
नानांचा विदर्भ दौरा…
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संपूर्ण विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दरम्यान कोरोना काळातील कार्याचा आढावा घेण्याबरोबरच कोरोनाच्या येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेच्या तयारीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.