महिलांना ‘शक्‍ती’हीन करणाऱ्या सरकारच्‍या समितीत राहून काय उपयोग?; आमदार श्वेताताई महालेंसह भाजपचे सर्व सदस्‍य देणार राजीनामा!

बुलडाणा ( कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाविकास आघाडी सरकारने महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी एकीकडे शक्ती कायद्याची समिती नेमली आणि दुसरीकडे मात्र मंत्र्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभा दिल्याचे चित्र आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संशयित वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदावरून हाकलले नाही तर शक्ती कायदा समितीमधील भाजपचे सर्व सदस्य पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा देतील, असा …
 

बुलडाणा ( कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाविकास आघाडी सरकारने महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी एकीकडे शक्ती कायद्याची समिती नेमली आणि दुसरीकडे मात्र मंत्र्यांना लैंगिक स्‍वैराचाराची मुभा दिल्याचे चित्र आहे.  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील संशयित वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदावरून हाकलले नाही तर शक्ती कायदा समितीमधील भाजपचे सर्व सदस्य पक्षश्रेष्ठींच्‍या आदेशानुसार राजीनामा देतील, असा इशारा चिखलीच्‍या लढवय्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सरकारला दिला आहे. यासंदर्भातील ट्विट सुद्धा श्वेताताईंनी केले असून, त्यात उद्धव ठाकरे ,शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुखांना टॅग केले आहे. पुरावे समोर असतानाही राठोड यांना पाठिशी घातले जात असल्याचा आरोपही त्‍यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले. मात्र त्यांना शरद पवारांनी पाठिशी घातले. मुंडेंवरील आरोप खोटे असल्याचे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता मेहबूब शेखवर आरोप झाले तर संपूर्ण राष्ट्रवादी अन आघाडी सरकार त्याच्या पाठीशी उभे राहिले. संजय राठोडांविरोधात ढीगभर पुरावे असताना देखील त्यांनाही पाठिशी घालण्यात येत आहे. पोहरादेवी संस्थानवर जायला सांगून त्यांना शक्तिप्रदर्शन करायला सांगितले जाते. समाज त्यांच्या पाठिशी उभा आहे हे दाखवण्यासाठीचा हा खटाटोप आहे, असा घणाघात आमदार महाले पाटील यांनी करून पूजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली. मंत्री संजय राठोड यांचा केवळ राजीनामा घेऊन सोडू नये तर त्‍यांच्‍याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजेत, अशी ठाम भूमिकाही त्‍यांनी मांडली. तात्काळ राठोड यांचा राजीनामा घेऊन त्‍यांना मंत्रिपदावरून पायउतार केले नाही तर शक्ती कायदा समितीतील भाजपचे सर्व सदस्य उद्या राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारमध्ये लेकी असुरक्षित
आघाडी सरकारमध्ये आया- बहिणींची अब्रु सुरक्षित नाही. मंत्री आणि पदाधिकारी लैंगिक स्वैराचार करत आहेत. सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. सरकारला लाज कशी वाटत नाही, असा संतापही आमदार श्वेताताई महाले यांनी व्‍यक्‍त केला.

राजीनाम्‍याबाबत अस्‍पष्टता…

वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्‍याचे वृत्त आहे. मात्र तो मुख्यमंत्र्यांनी स्‍वीकारल्याद्दल अद्याप स्पष्टता नाही. हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गेल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्‍यता आहे. वनमंत्री राठोड हे पत्नी शीतल राठोड आणि त्यांचे मेहुणे सचिन नाईक यांच्यासह चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्री राजीनाम्या बाबात माहिती देतील असे सांगितले जात आहे.