मागवला शाकाहारी, आला मांसाहारी
भडकलेल्या दिल्लीकर महिलेने अमेरिकन पिझ्झा कंपनीविरोधात ठोकला १ कोटींचा दावा
नवी दिल्ली : हॉटेलमधून विविध पदार्थांची होम डिलिव्हरी मागविण्याचे फॅड आता चांगलेच फोफावले आहे. पण ही सवय एका दिल्लीकर महिलेला चांगलीच अडचणीची ठरली असून तिने एका अमेरिकन कंपनीच्या आऊटलेटमधून शाकाहारी पिझ्झा मागवला असताना कंपनीने त्यांना मांसाहारी पिझ्झा डिलिव्हर केला. वर्षभरापूर्वी घडलेल्या या प्रकरणात कंपनी दाद देत नसल्याने आता त्या संतप्त महिलेने ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावला असून कंपनीविरोधात एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आपण शुद्ध शाकाहारी आहोत.पण कंपनीने पाठवलेला मांसाहारी पिझ्झा खाल्ल्याने आपले मन व शरीर अशुद्ध झाले.त्याची शुद्धी करण्यासाठी होमहवन करावे लागेल. त्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागेल. शिवाय या कृतीमुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी कंपनीने आपल्याला एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी,अशी मागणी महिलेने केली आहे. दीपाली त्यागी असे या महिलेचे नाव असून ती गाझियाबादची राहणारी आहे. तिला भरपाई देण्यास कंपनीने नकार दिल्याने हा खटला ग्राहक न्यायालयात आला असून त्यावर १९ मार्चरोजी सुनावणी होणार आहे.