उत्तरप्रदेशात पुन्हा योगीराज; सर्वेक्षणात योगींना बहुमत

 
नवी दिल्ली : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया टुडे आणि सी-वोटरने केलेल्या जनमत चाचणीचे निष्कर्ष भाजपला बहुमत मिळणार असल्याचे सांगत आहेत. जनमत चाचणीत सहभागी ४९ टक्के लोकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामकाजाबद्दल पूर्णपणे समाधानी असल्याचे सांगितले. १७ टक्के लोकांनी समाधान तर ३६ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या कामकाजाबद्दल नकारात्मक टिप्पणी केली आहे. एकंदरीत उत्तरप्रदेशातील ६६ टक्के लोकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाबद्दल कौतुक केले आहे.

उत्तरप्रदेशातील ३५ टक्के लोकांनी बेरोजगारी हा निवडणुकीचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. २३ टक्के लोकांनी महागाई, १० टक्के लोकांनी कोरोना महामारी, ७ टक्के लोकांनी भ्रष्टाचार तर २ टक्के लोकांना राज्याची बिघडलेली आर्थिक व्यवस्था हा प्रचाराचा मुद्दा राहील असे वाटते. उत्तरप्रदेशातील ७७ टक्के लोकांनी केंद्रातील मोदी सरकारच्या कामकाजाची प्रशंसा केली आहे.

उत्तरप्रदेशातील २२ टक्के लोक मोदींवर नाराज असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. उत्तरप्रदेशात आता लगेच लोकसभा निवडणुका झाल्या तर ४६ टक्के लोकांनी भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदान करणार असल्याचे म्हटले आहे तर ३१ टक्के लोक समाजवादी पार्टीच्या बाजूने आहेत. ११ टक्के लोकांनी मायावतींच्या बसपा तर १० टक्के लोकांनी काँग्रेसला पसंती दर्शविली आहे. सर्वेत सहभागी ६९ टक्के लोकांनी मोदी भ्रष्टाचार रोखण्यात यशस्वी झाल्याचे म्हटले आहे तर २९ टक्के लोकांना मोदींना भ्रष्टाचार हटवता आला नाही असे वाटते.