योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार की मथुरेतून? भाजप खासदाच्या स्वप्नात आले भगवान श्रीकृष्ण, म्हणाले, योगींना सांगा...

 
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. पुढील महिन्यात उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

भाजपात तिकीट वाटपावरून बैठका सुरू झाल्या आहेत. नुकतीच दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह उपस्थित होते. योगी आदित्यनाथ कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार या विषयावरही चर्चा झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून लढले तर संपूर्ण राज्यात हिंदुत्वाचा संदेश जाईल, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे तर काहींनी योगी आदित्यनाथ यांनी मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे सुचवले आहे.

भाजपचे खासदार हरनाथ यादव यांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहून योगी आदित्यनाथ यांना मथुरेतून निवडणूक रिंगणात उतरावे, अशी मागणी केली आहे. माझ्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण आले होते. योगी आदित्यनाथ यांना मथुरेतून निवडणूक लढायला सांगा, असे भगवान श्रीकृष्णाने म्हटल्याचे हरनाथ यादव यांनी म्हटले होते. गोरखपूर लोकसभा क्षेत्राचे पाच वेळा खासदार राहिलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हिंदुत्वाचा मोठा चेहरा मानले जातात. त्यामुळेच त्यांना मथुरा किंवा अयोध्येतून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.