एकांतात भेटायला बोलावले म्हणजे "तीच' मागणी कशावरून? -हायकोर्ट
Nov 7, 2021, 12:50 IST
रायपूर ः मला एकांतात भेटा असे म्हणणे लैंगिक संबंधांसाठीच आहे, असा अंदाज लावता येणार नाही, अशी टिपण्णी करत छत्तीसगढ उच्च न्यायालयाने एका सहायक प्राध्यापकाविरोधातील गुन्हा रद्द ठरवला आहे.
मॅडम, सुटी पाहिजे असेल तर मला एकांतात भेटा असे सुटीसाठी आपल्याला म्हटल्याचा आरोप करत फिर्यादी महिलेने पोेलिसांत तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी कलम ३५४ अ नुसार गुन्हा दाखल केला होता. न्यायालयासमोर हे प्रकरण आल्यानंतर न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास म्हणाले, की कलम ३५४ अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र फिर्यादी व आरोपीत कोणताही शारीरिक संपर्क झालेला नाही. लैंगिक संबंधाची थेट मागणी किंवा आवाहनही केलेलं नाही. केवळ अशी टिप्पणी करणं गुन्हा मानला जाऊ शकत नाही. मला एकांतात भेटा केवळ असे म्हटले म्हणून लैंगिक संबंधाची मागणी केली असा अंदाज लावता येणार नाही. लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करता येणार नाही.