LIVE : हेलिकॉप्टर दुर्घटनेत संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू!
श्री. रावत सकाळी पावणेआठच्या सुमारास दिल्ली विमानतळावरून विशेष विमानाने सुलूर येथे साडेअकराला पोहोचले होते. हवाईदलाच्या एमआय १७ या हेलिकॉप्टरने ते वेलिंग्टनकडे निघाले होते. वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये ते लेक्चर देणार होते.
हेलिकॉप्टरचा संपर्क १२.२२ ला तुटला. त्यानंतर काहीच वेळात हेलिकॉप्टरला आग लागून ते जंगलात कोसळल्याचे वृत्त आले. दुर्घटनेत रावत आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले होते. तातडीने मदतकार्य हाती घेऊन सर्वांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
संध्याकाळी त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे वृत्त जाहीर करण्यात आले. भारतीय हवाई दलाने अधिकृत व्टिटर हँडलवरून ही माहिती दिली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. शौर्यचक्र विजेते भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह जखमी असून, त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. हेेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण होते, पैकी १३ जणांचा मृत्यू झाला.
रावत यांच्या निधनामुळे देश हादरून गेला असून, ते देशाचे संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) ठरले. २०२० मध्ये रावत यांच्याकडे ही धुरा सोपविण्यात आली होती. ते पदावर असताना अनेक महत्त्वाच्या कारवाया यशस्वी झाल्या आहेत. या दुर्घटनेची सखोल न्यायालयीन चौकशी होणार आहे.