साखरपुड्यानंतरही दुसऱ्या मुलीशी चॅटिंग... गमावला जीव!

 
भोपाळ : लग्न ठरल्यानंतरही तो दुसऱ्या मुलीशी चॅटिंग करायचा. त्यामुळे आई - वडील व बहिणीने मिळूनच २५ वर्षीय तरुणाची हत्या केली. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामकृष्ण सिंग असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हा लपविण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनीच तो बेपत्ता असल्याची तक्रार दिल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ५ जानेवारीला हात- पाय बांधलेल्या अवस्थेत रामकृष्ण सिंगचा मृतदेह रुपारेल नदीत सापडला होता. पोलिसांनी तपासादरम्‍यान मोबाइल फोनचे लोकेशन ट्रेस केले. त्यात त्याच्या कुटंुबियांनीच त्याला मारले असावे, असे संकेत पोलिसांना मिळाले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर रामकृष्णचे वडील भिमन सिंह, आई जमुनाबई आणि बहीण कृष्णाबाई यांनी हत्या केल्याची कबुली दिली. रामकृष्णचे लग्न ठरले होते.

साखरपुडाही झाला होता, मात्र तरीही तो दुसऱ्याच मुलीसोबत चॅटिंग करत होता असे त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. तो फोनमध्ये नेहमी टाईमपास करायचा. जास्त वेळ तो फोनमध्येच घालवायचा. तो बेरोजगार होता. त्यामुळे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर नाराज होते. २ जानेवारी रोजी घरात वाद झाला. त्यानंतर वडिलांनी त्याला ढकलून खाली पाडले. त्याचे डोके भिंतीवर ठेचले. तो मेल्याचे लक्षात आल्यावर आई- वडील आणि त्याच्या बहिणीने त्याचे हात- पाय बांधून मृतदेह नदीत फेकून दिला, असेही पोलीस चौकशीत समोर आले आहे. गुन्हा लपविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मात्र अखेर पोलीस तपासात आई- वडिलांनीच रामकृष्णचा खून केल्याचे समोर आले.