भाजपमध्ये जाऊन मला हेमा मालिनी व्हायचे नाही..! चौधरींच्या वक्‍तव्‍यामुळे पेटले राजकारण, ठाकूर म्‍हणाले...

 
मथुरा : उत्तरप्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. प्रचारात अनेक नेत्यांची भाषणे चर्चेचा अन् वादाचा विषय ठरत आहेत. भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावरूनही वाक्‌युद्ध रंगले आहे. राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंती चौधरी यांनी हेमा मालिनी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे मोठे वादळ उठले आहे. चौधरी यांच्या विधानामुळे भाजपच्या नेत्यांनी सुद्धा त्‍यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

राष्ट्रीय लोकदलाने विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीसोबत युती केली आहे. त्यामुळे चौधरी सध्या प्रचारात उतरले आहेत. भाजपवर टीका करताना ते रोज आरोपांच्या फैरी झाडत आहेत. मथुरा जिल्ह्यातील मांट येथील प्रचारसभेत हेमा मालिनी यांचा उल्लेख करत चौधरी यांनी खोचक शब्दांत टीका केली. राष्ट्रीय लोकदल भाजपसोबत राहावे यासाठी भाजपने प्रयत्न केले. मात्र राष्ट्रीय लोकदलाने समाजवादी पार्टीसोबत युती केली.

rt

भाजपात जाऊन मला हेमा मालिनी व्हायचे नाही. मी तुमच्या खोट्या आमिषाला बळी पडणार नाही. आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. लखीमपूरमध्ये ज्या शेतकऱ्यांचा बळी गेला त्यांना काय मिळाले? हिंसेत सहभागी असलेल्या मुलाचे वडील अजूनही केंद्रीय मंत्रिमंडळात कसे, असे सवाल चौधरी यांनी केले. त्यानंतर चौधरी यांनी या विधानावर वादंग झाल्यावर स्पष्टीकरण दिले. भाजपने आमचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न केले.

काहींना खासदार बनविण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ती धुडकावली म्हणून मी उपहासात्मक टिप्पणी केली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चौधरी यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. हेमा मालिनी यांच्या सारख्या महान कलावंत भाजपमध्ये असल्याचा आम्हाला अभिमान आहे. हेमा मालिनी होणे वाटतं तितकं सोप नाही. मथुरेच्या लोकांचा उगाच त्यांना आशीर्वाद मिळाला नाहीत. मथुरेच्या त्या खासदार आहेत. तेथील जनतेचे प्रश्न संसदेत मांडून त्यांनी मथुरेचा विकास केला आहे. तुम्ही हेमा मालिनी होण्याची स्वप्नेही पाहू नका, असा टोला अनुराग ठाकूर यांनी लगावला आहे.