BL Sunday Special : शीतल कौलने सांगितले, काय झालं काश्मीरमध्ये... हिंदू मुली, महिलांवर बलात्कार होऊ लागले, अनेक गायब झाल्या, अनेकींचे शव नदीत तरंगताना दिसू लागले....

 
पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे जम्मू काश्मिर... हिमालयातून खळखळत वाहणाऱ्या स्वच्छ नद्या... आकाशाला स्पर्श करणारे देवदास वृक्ष... लाल आणि रसदार सफरचंद... यामुळे इथल्या हवेत एक वेगळाच सुगंध दरवळत होता. मात्र १९९० नंतर इथली परिस्थिती बदलू लागली... सफरचंदाच्या बागा सुकल्या... घरांच्या ठिकाणी जागो जागी जळालेले खंडर दिसू लागले... जिकडे तिकडे प्रेतांचा दुर्गंध... अंत्यसंस्कार करायला माणसे शिल्लक नसायची... हे भयानक रूप आहे त्या दहशतीचे, ज्यामुळे लाखो काश्मिरी पंडितांना त्यांचं सर्वकाही सोडून केवळ एक बॅग घेऊन पलायन करावं लागलं... १९९० च्या १९ जानेवारीला काश्मिरातून घर सोडून परिवारासोबत निघणारी शीतल कौल व्यक्‍त झाली...

काश्मिरात मोठमोठ्या बंगल्यांत राहणाऱ्या हिंदूंनी हातात केवळ एक बॅग घेऊन पळ काढला. अनेक काश्मिरी पंडितांच्या वाट्याला शेळ्या मेंढ्यांसारखे निर्वासितांचे जगणे आले. शीतल कौल सांगते, की काय काय घ्यायचे होते, दोन मजली घर होते... घरात सहा खोल्या होत्या... मोठे स्वयंपाक घर होते. गाय, बकऱ्या, शेती, सफरचंदाची आणि अक्रोडाची बाग सर्व काही होतं. मात्र मशिदीमधून आवाज आला आणि रातोरात बॅगमध्ये कपडे भरून निघालो. तिथले घर त्या लोकांनी जाळून टाकले, हे सांगताना शीतलचा आवाज थरथरत होता. आपबिती सांगताना अनेकदा ती अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होती. शीतल त्या लाखो काश्मिरी पंडितांपैकी एक आहे ज्यांना काश्मीर सोडून पळून यावे लागले. सध्या ती दिल्लीतील रोहिणीजवळ मंगोलपूर गावात राहते. प्रचंड दाटीवाटीच्या वस्तीत दुसऱ्या मजल्यावर शीतल राहते. एकाच खोलीत बेडरूम, त्यातच स्टडी रूम आणि तिथेच स्वयंपाक घर. गरिबी झाकण्यासाठी जागोजागी लावलेले लाल पडदे, अशी शीतलच्या कुटुंबियांची सध्याची अवस्था आहे.

शीतल सांगते, की काश्मीरमध्येच तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. आमच्या सण उत्सवांत मुस्लिमसुद्धा सहभागी व्हायचे. लग्न समारंभात सुद्धा एकमेकांना निमंत्रण द्यायचे. फक्त जेवण वेगळे. मात्र त्यानंतर एकाएकी सगळंच बदललं. हिंदू मुलींना घराबाहेर पडणे कठीण झालं. हिंदू तरुणांना धर्मपरिवर्तन करायला सांगण्यात येऊ लागले. मशिदीमधून द्वेष पसरवला जाऊ लागला. काश्मीर को पाकिस्तान बनायेंगे... अशा घोषणा कानावर येऊ लागल्या. हिंदू मुली, महिलांवर बलात्कार होऊ लागले. अनेक ओळखीच्या हिंदू मुली अचानक गायब झाल्या. मुलींचे काय झाले हे कुटुंबियांना सुद्धा माहीत नव्हते. अनेक मुलींचे शव नदीत तरंगताना दिसत होते. आपल्याच घरात चोर घुसले तर रस्त्यावर फिरणेच ठीक, म्हणून आम्ही तसेच केले.

एक ट्रक भाड्याने केला. दोन - तीन काश्मिरी पंडितांचे परिवार त्याच ट्रकने बाहेर पडलो. आधी जम्मू येथील शरणार्थी कॅम्पमध्ये राहिलो, त्यानंतर वेगळे झालो... असे शीतलने सांगितले. काश्मीरमधून निघालो आणि आम्ही सगळे वेगवेगळे झालो. कोण कुठे कुठे गेले माहीत नाही. आता काश्मीरसोबत केवळ स्वप्नांचे नाते उरले. जेव्हा स्वप्न पाहते तेव्हा काश्मीर दिसते. तिथले घर, तिथल्या नद्या, दऱ्या, बागा, थंड हवा. मात्र डोळे उघडल्यानंतर दिसते ती इथली ही छोटीसी खोली, असे सांगताना शीतल तिचे अश्रू पुसते. तिथे होते तेव्हा आमच्या बागेत भरपूर सफरचंद होते. काही विकायचे काही हवामानामुळे खराब व्हायचे. आता दिल्लीत दिसतात सफरचंद पण बागेऐवजी ठेल्यावर. लहान लहान, कडक, हिरवे - पिवळे, बेचव आणि तरीही महाग. मात्र आता सफरचंद खाण्याची इच्छाच होत नाही, असे शीतल सांगते...