५० कंपन्यांनी नाकारले, पण जिद्दी संप्रितीने गुगलमध्ये नोकरी मिळवलीच, महिन्याला मिळणार ९० लाख रुपये पगार!

 
नवी दिल्ली : अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. मात्र एका २४ वर्षीय तरुणीने अपयशाच्या तब्बल ५० पायऱ्या चढल्यानंतर उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे. ५० कंपन्यांनी जॉब नाकारल्यानंतर तिला गुगलने जॉब ऑफर केला असून, वर्षाला तिला १ कोटी १० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी दिली आहे. त्यामुळे महिन्याला जवळपास ९ लाख रुपये एवढा पगार तिला मिळणार आहे.

संप्रिती यादव असे या तरुणीचे नाव असून, ती मूळची बिहारच्या पाटणा येथील रहिवासी आहे. दिल्लीच्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून तिने २०२१ मध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने नोकरीचा शोध सुरू केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या कंपनीत जॉब मिळावा यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. तिने तब्बल ५० कंपन्यांमध्ये जॉबसाठी मुलाखत दिली. मात्र तिला अपेक्षित यश मिळालेच नाही. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांवर तिने पुन्हा पुन्हा तयारी सुरू केली.

प्रचंड अभ्यास केला. त्यानंतर तिने गुगलमध्ये मुलाखत दिली आणि तिच्या कष्टाचे चीज झाले. गुगलने तिला १ कोटी १० लाख रुपयांचे म्हणजे मासिक जवळपास ९ लाख रुपयांच्या पगाराची ऑफर दिली. १४ फेब्रुवारीपासून संप्रिती तिच्या नव्या जॉबवर रूजू झाली आहे. गुगलच्या मुलाखतीमध्ये तिच्या नऊ फेऱ्या झाल्या. यादरम्यान तिला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. मात्र तब्बल ५० मुलाखतींच्या अपयशाचा अनुभव तिच्या गाठीशी होता. त्यामुळे या मुलाखतीत तिने चांगले गुण मिळवून यश संपादन केले. मोठ्या पॅकेजपेक्षा लंडनमधील कार्यालयात काम करण्याची संधी मिळणार असल्याने मी खूप आनंदी आहे. एकदा अपयश आले म्हणून खचून जायचं नसतं. प्रयत्न केल्यानंतर तुमच्या कर्माचे फळ नक्कीच मिळते, असे संप्रिती यादव सांगते.