वाहऽऽ मोदींनी ऑर्डर दिली बरं..!; मोफत लसीकरणाची तयारी, ७४ कोटी डोस येणार
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने मोफत लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. लसीची पहिली ऑर्डर ७४ कोटी डोसची असून, यात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि बायोलॉजिकल ई या तीन प्रकारच्या डोसचा आहेत. निती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली.
ऑर्डर पूर्ण होण्यासाठी मात्र डिसेंबर महिना उजाडणार आहे. कोविशिल्डचे २५ कोटी डोस, कोवॅक्सिनचे १९ कोटी डोस तर बायोलॉजिकल ई च्या ३० कोटी डोसची मागणी नोंदविण्यात आली आहे. बायोलॉजिकल ईचे डोस सप्टेंबरपर्यंत मिळतील. लसींच्या मागणीसाठी आधीच सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला ३० टक्के रक्कम केंद्र सरकारने अदा केलेली आहे. २१ जूनपासून देशातील सर्व राज्यांतील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देणार आहे. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करणार आहे.