राष्ट्रीय बातमी ः सर्वोच्च न्यायालयाची उद्विग्न टिपण्णी… पत्नीसोबत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवून आत्महत्येस प्रवृत्त करणारे जेलमध्येच राहण्याच्या लायकीचे!
नवी दिल्ली : पत्नीसोबत बळजबरी अनैसर्गिक संबंध ठेवणे, हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणे हा क्रूर गुन्हा आहे. असे आरोपी तुरुंगात राहण्याच्याच लायकीचे आहेत, अशी महत्त्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. एका जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली.
घरगुती हिंसाचार, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एका आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. प्रदीप नावाचा आरोपी दोन वर्षांपासून तुरूंगात आहे. त्याच्या पत्नीने हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून तो तिचा छळ करायचा. तिच्याशी अनैसर्गिक शरीरसबंध ठेवायचा. पत्नीचे खासगी फोटो व व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या त्रासाला कंटाळून प्रदीपच्या पत्नीने आत्महत्या केली होती, असा आरोपी दया दाखविण्याच्या लायकीचा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीच्या वकिलाने आरोपी हा सरकारी कर्मचारी आहे. जामीन मिळाला नाही तर नोकरी गमवावी लागेल, असा युक्तिवाद केला होता. तेव्हा अशा व्यक्तीने नोकरी गमावणे योग्य राहील, अशी टिपण्णी न्यायालयाने केली.