मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली राज्यपालांची तक्रार!
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचीही तक्रार केली आहे. पावणे दोन तास चाललेल्या बैठकीत आरक्षणासोबतच राज्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा करताना, राजकीय प्रश्नही तडीस लावण्याचा प्रयत्न झाला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आडमुठी भूमिका घेऊन राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या 12 सदस्यांच्या नावांना संमती दिली नाही, असे पंतप्रधानांना सांगण्यात आले. राज्य सरकारने गेल्या वर्षीच राज्यपालांकडे ही नावे पाठवली आहेत. सर्व संकेत आणि नियमांना धरून ही प्रक्रिया पार पाडल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेही मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. दुसरीकडे राज्यपालांची तक्रार केल्याबद्दल भाजपाने टीका केली असून, मराठा आरक्षणाच्या विषयावर बैठकीत चर्चा करणे अपेक्षित असताना 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा केली. हे आमदार पुढचे 12 हजार वर्षे नेमले नाहीत तर काही बिघडणार नाही, अशी टिप्पणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.