थलैवा रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; भाजपला राजकीय लाभ होणार?
नवी दिल्ली : तामिळनाडू विधानसभेच्या २३१ जागांसाठी ६ एप्रिलरोजी मतदान होणार आहे. त्याचे अचूक टायमिंग साधत केंद्र सरकारच्यावतीने दिल्या जाणार्या प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रासिद्ध अभिनेते रजनीकांत यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
रजनीकांत यांना २०१९ या वर्षाचा हा पुरस्कार दिला जाणार आहे. या घोषणेने रजनीकांत यांचे चाहते खूष झाले असून त्यांच्यावर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर करण्याच्या केंद्र सरकारच्या अचूक टायमिंगवर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. रजनी यांच्या चाहत्यांची संख्या आणि प्रेम लक्षात घेता तामिळनाडूत त्याचा राजकीय लाभ भाजप व अण्णाद्रमुकला होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यावरुन राजकारणही रंगण्याची चिन्हे आहेत. फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील योगदानासाठी केंद्र सरकारतर्पेâ दिल्या जाणारा हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो.यंदा या पुरस्काराचे ५१ वे वर्ष असून तो रजनीकांत यांना दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जवडेकर यांनी ट्विटरवरही त्याची माहिती दिली. पुढील महिन्यात एका विशेष समारंभात रजनीकांत यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. रजनीकांत अॅक्शन आणि खटकेबाज संवादांसाठी लोकप्रिय आहेत. त्यांनी आजवर शेकडो हिंदी, तमीळ सिनेमांतून काम केले आहे. सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते म्हणूनही ते ओळखले जातात.