दहीहंडीमुळे कोरोना नियमांचा भंग; १९ जणांविरुद्ध गुन्‍हा

खामगाव तालुक्‍यातील घटना
 
 
पिंपळगाव राजा पोलीस ठाणे

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कार्तिक पौर्णिमेनिमित्त दहीहंडी महोत्‍सव आयोजित करून त्‍यात कोरोनाविषयक नियमांचा भंग केला म्‍हणून पिंपळगाव राजा पोलिसांनी १९ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. ही कारवाई खामगाव तालुक्‍यातील भालेगाव बाजार येथे २० नोव्‍हेंबरला करण्यात आली.

नापोकाँ अनिल इंगळे यांनी या प्रकरणात तक्रार दिली. सहायक पोलीस निरिक्षक सतीश आडे यांच्यासह चालक सहायक फौजदार आणि श्री. इंगळे हे पेट्रोलिंग करत असताना त्‍यांना भालेगाव बाजार येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दहीहंडी सोहळा आयोजित केल्याची माहिती मिळाली. बसथांब्‍याजवळ आयोजक गुलाबराव रामकृष्ण हुरसाड, संस्थानचे अध्यक्ष सदाशिव एकडे, श्रीराम प्रल्हाद मांडवेकर, तुकाराम श्रीराम सुरडकार, ज्ञानेश्वर प्रल्हाद हुडसाड, श्रीकृष्ण लहु कळसकार, गोपाल उखर्डा कवळे, रामेश्वर जगन्‍नाथ बेलोकार, नानाराव कोल्हे, राजेश विष्णू एकडे, शांताराम तुकाराम एकडे, निंबाजी पांडुरंग टाले,गजानन रामभाऊ गवारे, सुरेश महादेव तिजारे, शिवहरी गोविंदा रोहणकार, प्रमोद कवळे, शालीग्राम सुरडकार, निवृत्ती रोहणकार,काशिनाथ बेलोकार आदींनी हा सोहळा अयोजित केल्याचे पोलिसांना कळाले. ७०० ते ८०० भाविकांना एकत्र जमवून कोरोना महामारीचा संसर्ग पसरेल हे माहीत असूनही सोहळा पार पाडला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचा भंग झाला.