बुलडाण्यात दोन दुचाकी धडकल्या; ५ तरुण जखमी

चिखली रोडवरील घटना
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकी एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात ५ तरुण जखमी झाले. ही घटना चिखली रोडवर गोलांडे लॉन्सजवळ आज, २ नोव्‍हेंबरला रात्री साडेनऊच्‍या सुमारास घडली.
 


भाऊसाहेब गाडेकर (२४, रा. वृंदावननगर) हा तरुण मोटारसायकलने (क्र. एमएच २८ एएम १०३०) चिखलीकडे जात होता. त्‍याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीशी त्‍याची धडक झाली. या मोटारसायकलवर सुजित मोरे हा मित्रांसोबत केळवदवरून बुलडाणाकडे येत होता. सुजितसोबत प्रणव मोरे, जीवन खंदारे, ओम खंदारे चौघे होते. अपघातात या चौघांसह भाऊसाहेब जखमी झाला. याच भागात राहणाऱ्या भाजपाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव सौ. शालिनीताई बुंधे-चौथनकर यांना अपघाताची माहिती मिळताच त्‍यांनी तातडीने धाव घेऊन जखमींना रस्त्याच्या बाजूला आणत पोलिसांना कॉल केला. शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पथदिवे बंद असल्याने वाढले अपघात

चिखली मार्गावरील पथदिवे नेहमी बंद असतात. त्‍यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शिवाय मागे लुटमारीच्या घटनाही घडल्या आहेत. या बद्दल सौ. शालिनीताई बुंधे-चौथनकर यांनी संताप व्यक्‍त केला. पथदिवे नियमित सुरू राहिले नाहीत तर या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी करू. यानंतरही दखल घेतली गेली नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशारा त्‍यांनी दिला.