चिखलीत समोर आले ट्रिपल तलाकचे प्रकरण!

विवाहितेची पोलिसांत धाव!!
 
तलाक

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या व तिनदा तलाक म्‍हणून घटस्‍फोट देणाऱ्या पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपी चिखलीच्या बारभाई मोहल्ल्यातील रहिवासी आहेत.

सध्या माहेरी देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथे राहत असलेल्या २८ वर्षीय विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. २८ वर्षीय विवाहितेचा विवाह चिखलीच्या वसीम खान अकिल खान याच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. मात्र माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरचे लोक तिचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या वडिलांची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने तिने माहेराहून पैसे आणण्यास नकार दिला असता पती वसीमने तलाक, तलाक, तलाक... असे म्हणून तिला तलाक दिला व घराबाहेर हाकलले, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून  वसीम खान अकील खान, जाकिरबी अकिल खान व रुबिना ऊर्फ मुन्‍नी अकिल खान (तिघे रा. बारभाई मोहल्ला, चिखली)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.