त्‍यांची गेली दुचाकी अन्‌ जीव टांगणीला ग्रामपंचायतीचा!

मोताळा तालुक्‍यातील प्रकार
 
 
दुचाकी चोर
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामखेड (ता. मोताळा) येथील ग्रामसेवकाची मोटारसायकल चोरीला गेली आहे. पण यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून, या दुचाकीच्या डिक्‍कीत ग्रामपंचायतीचे शिक्के, बँक पासबुक, चेकबुक, चाव्यांचा गुच्‍छा होता. या साहित्याचा चोरट्याने गैरवापर केला तर... या भीतीने सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यही गर्भगळीत झाले आहेत.
ग्रामसेवक विनोद उत्तमराव काळवाघे (४६, रा. विष्णूवाडी, बुलडाणा) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी स्वतःच्या मालकीची होंडा शाईन मोटारसायकल (क्र एमएच २८ एव्ही १८५३) मोताळा येथील डॉ. के.एल. पाटील कॉम्प्लेक्सजवळ लॉक करून उभी केली. काही कामानिमित्त कॉम्प्लेक्सच्या वरच्या माळ्यावर गेले. ही संधी साधून चोरट्याने त्यांची ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल लंपास केली. ही घटना दुपारी साडेतीन ते पाचच्या दरम्यान घडली. मोटारसायकलच्या डिक्कीत खामखेड ग्रामपंचायत कार्यालयाचे शिक्के, बँक पासबुक, चेकबुक, चाव्यांचा गुच्छ, वैयक्तीक खात्याचे पासबुक आणि पेनड्राइव्ह आदी साहित्य होते. ग्रामसेवक काळवाघे यांनी परिसरात मोटारसायकलीचा शोध घेतला. मात्र काहीच सुगावा लागला नाही. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी काल, ९ नोव्हेंबर रोजी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास नापोकाँ दीपक पवार करत आहेत.