ठाणेदार म्‍हणाले, वाईट घटना टाळायच्या असतील तर इतके कराच!

बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात घेतली व्यापाऱ्यांची बैठक
 
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या दरोडे, चोरीच्या घटनांमुळे व्यापारी, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही भीती दूर करतानाच पोलीस व्यापाऱ्यांच्या पाठिशी असल्याचा दिलासा काल, १८ नोव्‍हेंबरला सायंकाळी बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रदीप साळुंके यांनी बुलडाणा शहरातील व्यापाऱ्यांना दिला. याशिवाय दुकानात कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत त्‍यांनी काही सूचनाही केल्या.

city

बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. चिखली शहरात १६ नोव्हेंबरला रात्री पावणेदहाच्या सुमारास दुकानात शिरून दोन चोरट्यांनी आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांची पोटावर चाकूचे वार करून हत्या केली. त्यामुळे व्यापारी भयग्रस्त झाले आहेत. चिखलीची घटना लक्षात घेता ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. श्री. साळुंके यांनी सांगितले, की सर्वप्रथम सीसीटिव्ही कॅमेरे प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानात लावावे. दुकानाच्या बाहेरसुध्दा कॅमेरा लावावा. ज्यामुळे तुमच्या दुकानावर जर कोणी लक्ष ठेवत असेल तर तुम्हाल कळेल. दुकानात प्रत्येकवेळी किमान दोन व्यक्‍ती असले पाहिजेत. ज्यामुळे काही घटना घडल्यास तर तो मदतीला धावून येईल किंवा पोलिसांना कळवेल. त्यासाठी घरातील व्यक्ती किंवा नोकर वर्ग हा जवळ असला पाहिजे.

रात्री आपण कॅश जुळविण्याचे काम करतो. उशिरापर्यंत काम करत असाल तर दुकानांचे दोन्ही शटर बंद करून घ्यावे. त्यानंतर तुम्ही दुकान बंद करतात तेव्हा तुमच्यासोबत दोन व्यक्ती असणे आवश्यक आहे. सीसीटीव्‍ही कॅमेऱ्याद्वारे दुकानाकडे कोणी लक्ष देते का हेही पाहणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या दुकानात ठळक पद्धतीने दिसेल असा पोलिसांचा नंबर मोठ्या अक्षरात टाकावा, असे ठाणेदार म्‍हणाले. बैठकीला सतिश कोठारी, विजय बाफना, अमरचंद कोठारी, दिलीप व्यवहारे, विजय कुळकर्णी, मुकेश नैनानी, शंकरलाल मंगताणी, दिलीप इंगळे, प्रदीप छाजेड, राजेश देशलहरा आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.