भरधाव ॲपेची दुचाकीला धडक; चिखलीत एकाचा मृत्यू, एक जखमी...
Feb 17, 2026, 10:40 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव वेगातील ॲपे वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजता चिखली–साकेगाव रस्त्यावर घडली. राजेश रमेश बोंद्रे (वय ५५, रा. जयस्तंभ चौक, चिखली) यांचा या अपघातात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश बोंद्रे हे आत्माराम डहाके (रा. माळशेबा) यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच-२८ बीएम २३४१ ने शेताकडे जात होते. त्यावेळी साकेगावकडून चिखलीकडे येणाऱ्या ॲपे क्रमांक एमएच-२८ एच ५४४२ च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बोंद्रे रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित ॲपे चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी श्रीकांत बोंद्रे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.