अल्पभूधारक शेतकरी पुत्राने घेतला गळफास!

जळगाव जामोद तालुक्यातील घटना
 
 
फाशी

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पभूधारक शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, १४ नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास जामोद (ता. जळगाव जामोद) येथे समोर आली. नीलेश भगवान हागे (२५, जामोद, ता. जळगाव जामोद) असे आत्महत्या केलेल्या शेतकरीपुत्राचे नाव आहे.

नीलेशचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. नीलेश खासगी वायरमनचेही काम करून कुटूंबाला हातभार लावत होता. नीलेशने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीच्या छताला लाकडी बल्लीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. काल पहाटे घरातील सदस्य झोपेतून उठल्यानंतर त्यांना नीलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तपास जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे नापोकाँ उमेश शेगोकार करीत आहेत.