चोरट्या मार्गाने रेती वाहतूक; धाडजवळ १२ लाखांची कारवाई

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चोरट्या मार्गाने रेती वाहतूक करणारे टिप्पर धाड पोलिसांनी पकडले. १२ लाख ९ हजार रुपयांची ही कारवाई धाड- औरंगाबाद रोडवरील भोंडे पेट्रोलपंपासमोर हॉटेल शिवराणाजवळ काल, २४ नोव्‍हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.

पाे.ना. युवराज मुळे यांच्‍या तक्रारीवरून टिप्पर चालक रामेश्वर कचरू काकडे (४०, रा. बोरगाव मठ ता जाफराबाद जि. जालना) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून धाड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. पोकाँ श्री. सोनुने आणि श्री. मुळे पेट्रोलिंग करत असताना त्‍यांना हॉटेल शिवराणाच्या बाजूला उभ्या टिप्परमधील रेतीवर पाणी मारणे सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने तिथे धाव घेतली. टिप्परचालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना मागितला. मात्र त्‍याने परवाना नसल्याचे सांगितले. केळना नदीपात्रातून (जि. जालना) रेती आणली असून, बुलडाण्याला घेऊन जात असल्याचे त्‍याने पोलिसांना सांगितले. त्‍यामुळे पोलिसांनी टिप्पर पोलीस ठाण्यात आणून जमा केले आणि चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. ९ हजार रुपयांची ३ ब्रास रेती आणि १२ लाखांचे टिप्पर अशी एकूण १२ लाख ९ हजार रुपयांची ही कारवाई असून, तपास पो. ना. बऱ्हाटे करत आहेत.