धक्कादायक! महिन्याला ८ लैंगिक अत्याचार, १० विनयभंग, ४ खून!

 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बेरोजगारी वाढली की गुन्ह्यांचे प्रमाण वाढते हा नियम बुलडाणा जिल्ह्यालाही लागू झाल्याचे बुलडाणा लाइव्हच्या हाती आलेल्या धक्कादायक आकडेवारीवरून समोर येत आहे. गेल्या १० महिन्यांत जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, महिन्याला सरासरी १० विनयभंग तर लैंगिक अत्याचाराचे ८ गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. खुनाच्या गुन्ह्यांचे प्रमाण महिन्याला सरासरी ४ इतके आहे.

१ जानेवारी ते ३० ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत आर्म ॲक्ट कायद्याअंतर्गत २० गुन्हे दाखल झाले आहेत. २०२० या वर्षात या कालावधीत या गुन्ह्यांचा आकडा ६ इतका होता. यंदा त्यात १४ ने वाढ झाली आहे. लैंगिक अत्याचाराचे आतापर्यंत ८६ गुन्हे दाखल झाले आहेत. मागील वर्षी या कालावधीत हा आकडा ७१ इतका होता. विनयभंगाचे  ३६० गुन्हे दाखल झाले आहेत. मागील वर्षी या कालावधीत ३४८ गुन्हे दाखल झाले होते. १० महिन्यांत दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ४ दरोड्यांचा घटना घडल्या होत्या. यावर्षी यात तब्बल २४ गुन्ह्यांची वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ४२ खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ३८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे.