तलवारीने केक कापणाऱ्याला शेगाव पोलिसांचा दणका!

हा वाढदिवस लई लक्षात राहील भो...
 
शेगाव शहर पोलीस ठाणे
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वाढदिवस अविस्मरणीय ठरावा यासाठी विचित्र कारनामे करणाऱ्यांची कमी नाही. असाच विचित्र कारनामा शेगावमध्ये एका तरुणाने केला. त्‍याचा हा वाढदिवस त्‍याच्‍या आता कायम स्मरणात राहील, याची व्यवस्‍था शेगाव शहर पोलिसांनी केली आहे. त्‍याने वाढदिवसा केक तलवारीने कापला होता. पोलिसांनी त्‍याला अटक केली आणि तलवारही जप्त केली. ही कारवाई आज, १० नोव्हेंबर रोजी सकाळी दहाला शेगाव शहरातील गांधी चौकात करण्यात आली.
देवराज रघुनाथ साहू (४६, रा. शिवनेरी चौक, शेगाव) असे आरोपीचे नाव आहे. देवराजने वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापला होता. याबद्दलची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. आज सकाळी देवराज गांधी चौकातील बालाजी फास्ट फूडच्या चायनीज दुकानावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे पोहोचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. शेगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ गजेंद्र रोहनकार, नरेश तायडे, महेंद्र नारखेडे करीत आहेत.