रविकांत तुपकरांच्या वाहनाला अपघात; दुचाकीस्वार दोघे जखमी

चिखली तालुक्यातील घटना
 
 
file photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मुंबईला जात असताना बेराळा फाटा (ता. चिखली) येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. येवता येथून बेराळा येथे जाताना रस्ता ओलांडणारे दोन दुचाकीस्वार तुपकरांच्या गाडीला धडकले. यात दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले. गजानन सोळंकी आणि तुषार परिहार (दोघेही रा. येवता, ता. चिखली) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. अपघात घडताच तुपकरांनी दोघांनाही आपल्या वाहनात घेऊन चिखली येथील डॉ. महिंद्रे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही तरुणांना औरंगाबाद येथे नेण्यात येत आहे. स्वतः रविकांत तुपकर जखमी तरुणांना औरंगाबादला घेऊन जात आहेत.
२४ नोव्‍हेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईला बैठक होत आहे. या बैठकीसाठी रविकांत तुपकर हे सौरभ सावजी यांच्या मालकीच्या असलेल्या इनोव्हा कारने मुंबईसाठी निघाले होते. चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्याजवळ दोन तरुण भरधाव बेराळ्याकडे जात होते. रस्ता ओलांडत असताना दुचाकी तुपकरांच्या वाहनावर आदळली. दुचाकी चालवणारा तरुण हा नवीनच दुचाकी चालविणे शिकला असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात तुपकरांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर लगेच तुपकरांनी दोन्ही तरुणांना चिखली येथे दाखल केले. तुपकरांनी स्वतः त्यांचे वाहन चिखली पोलीस ठाण्यात जमा केले. त्यानंतर दोन्ही तरुणांना रुग्णवाहिकेत घेऊन तुपकर औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले.