सोयाबीन विकून परतणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला!

मुलगा गंभीर, देऊळगाव राजा तालुक्यातील घटना
 
धावत्या दुचाकीवरून पडल्याने तरुण गंभीर, मोताळा तालुक्‍यातील अपघात

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सोयाबीन विक्री करून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्‍यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. आज, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास देऊळगाव मही येथील दिग्रस चौकात हा अपघात झाला.

नारायणखेड (ता. देऊळगाव राजा) येथील अशोक कडूबा डोईफोडे (५२) व मुलगा  गणेश अशोक डोईफोडे (२९) हे सोयाबीन विक्री करण्यासाठी देऊळगाव मही येथे आले होते. शेतमालाची विक्री झाल्यानंतर दोघे पिता- पूत्र नारायणखेड येथे परतत होते. दिग्रस चौकात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने देऊळगाव राजा हलविण्यात आले. मात्र वडील अशोक डोईफोडे यांचा वाटेतच मृत्यू झाला. मुलगा गणेशवर देऊळगाव राजा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अशोक डोईफोडे यांचा पुतण्या रामेश्वर विठोबा डोईफोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.