विजेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्‍यू; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बकऱ्यांसाठी पाला तोडायला चढले होते झाडावर...
 
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बकऱ्यांसाठी पाला तोडायला झाडावर चढलेल्या  ६० वर्षीय वृद्धाचा झाडाजवळून गेलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून मृत्‍यू झाला. ही दुर्दैवी घटना आज, ११ नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास वरवंड (ता. बुलडाणा) जवळील पिंपरखेड फाट्यानजिक हॉटेल गारवासमोर घडली.
करीम शाह मलंक शाह (रा. वरवंड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बकऱ्यांसाठी पाला आणायला ते सकाळी घरातून बाहेर पडले होते. पिंपरखेड फाट्याजवळील पिंपळाच्या झाडावर ते चढले होते. पाला तोडत असताना झाडाजवळून गेलेल्या विजेच्या तारेला त्‍यांचा स्पर्श झाला. त्यामुळे शॉक लागून त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. परिसरातील लोकांनी धाव घेऊन महावितरणच्‍या वायरमनला बोलावून घेतले. शाह यांना उतरवून जिल्हा सामान्य रुग्‍णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. शाह यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत. तिन्ही मुले बाहेरगावी कामाला असतात.