इन्‍स्‍टाग्रामवर आक्षेपार्ह स्‍टेटस; दोन तरुणांना अटक!

शेगाव शहर पोलिसांची कारवाई
 
instagram
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः इन्‍स्‍टाग्रामवर जातीय तेढ निर्माण करणारे स्‍टेटस ठेवणाऱ्या दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी १४ नोव्‍हेंबरला कारवाई केली. नागेश सुरेश गावंडे (२१, रा. संगमनगर, भुतबंगला परिसर, शेगाव) व अजय श्याम घोंगे (१८, रा. भुतबंगला परिसर, शेगाव) अशी या संशयितांची नावे आहेत. त्‍यांनी दोन धर्मियांत एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल असे स्‍टेटस ठेवले होते.

पोलिसांनी त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून अटक केली. पोलीस उपनिरिक्षक श्रीकृष्ण डांगे हे सहकारी पोहेकाँ यशवंत राखोंडे यांच्यासोबत पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री १२ च्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. तपास ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे, पोहेकाँ गजानन वाघमारे, पो.ना. गणेश वाकेकर, पो. ना. उमेश बोरसे, पो.काँ. विजय साळवे, पो.काँ. श्री. बारवाल करत आहेत.

ठाणेदार म्‍हणतात...
दोन धर्म, समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश, संभाषण, व्हिडिओ कोणीही सोशल मीडियावर व्हायरल करू नये. लाइक, शेअर किंवा त्‍यावर कमेंटही करू नये. तसे केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अनिल गोपाळ, ठाणेदार, शेगाव शहर