आणखी एका आत्‍महत्‍येने हादरले नांद्रा कोळी!

२४ वर्षीय तरुणाने शेतात घेतला गळफास!!
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी आणखी एका आत्‍महत्‍येने हादरले आहे. २४ वर्षीय तरुणाने स्वत:च्या शेतात बेडाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना आज,  १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समोर आली.
प्रशिक सुखदेव जाधव (रा. नांद्राकोळी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. १६ नोव्हेंबर रोजी प्रशिकच्या चुलत भावाचा गौतम पंढरी जाधव यांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. अंत्यविधी आटोपून प्रशिक गावातून मोटारसायकल घेऊन बाहेर निघून गेला होता. नंतर तो परतलाच नाही. त्याचा सर्व ठिकाणी शोध घेतला. आज सायंकाळी बकऱ्या चारून परतणाऱ्या काही जणांना गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील त्‍याच्याच शेतात बेडाच्या झाडाला प्रशिकने गळफास घेतल्याचे दिसून आले. बकऱ्या चारणाऱ्यांनी गावात येऊन लोकांना माहिती दिली. गावातील पोलीस पाटील व सरपंचांनी घटनास्थळी जाऊन ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्‍याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तो ड्राइव्हर म्‍हणून काम करत होता. घरात एक छोटा भाऊ व वडील आहेत. वडील शेती करतात.