दिवाळीत भररस्त्यात खून... न्यायालयाने सुनावली ही शिक्षा!

खामगाव तालुक्‍यातील घडली होती घटना
 
court

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जुन्या वादातून दिवाळीच्या दिवशी ४१ वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना ३० ऑक्टोबर २०१६ रोजी उकळी बुद्रूक (ता. संग्रामपूर) येथे घडली होती. याप्रकरणी  आज, १५ नोव्हेंबरला खामगावच्‍या न्यायालयाने खून करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीला जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान लतीफ पटेल(२४, रा. उकळी बुद्रूक ता. संग्रामपूर)असे आरोपीचे नाव आहे.

इम्रानचे गावातीलच कैलास कांशीराम गव्हाळे(४१) यांच्यासोबत वाद होता. ३१ ऑक्टोबर २०१६रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास कैलास गव्हाळे शेतातून बकऱ्या चारून घरी परतत होते. त्यावेळी इम्रानने कैलास यांच्यासोबत वाद घालत त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले होते. त्यानंतर इम्रान पळून गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कैलास यांना प्रत्यक्षदर्शींनी दवाखान्यात नेले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. कैलास यांच्या भावाच्या तक्रारीवरून तामगाव पोलीस ठाण्यात इम्रानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

३ नोव्हेंबर २०१६ रोजी इम्रानला अकोला रेल्वेस्थानकावरून अटक करण्यात आली होती. न्यायालयात चाललेल्या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सागर शालीग्राम तायडे आणि अनिल तायडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणी अंती इम्रानने कैलास यांचा खून केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे खामगाव येथील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. एस .वैरागडे यांनी आरोपीला आजन्म सश्रम जन्मठेपेची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ३ महिन्याची साधी कैद व दंड भरल्यास त्यातील ५ हजार रुपये तक्रारदाराला देण्याचे आदेश देण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने  सरकारी वकील रजनी बावस्कर- भालेराव यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक कलीम बेग आणि कोर्ट मोहरर म्हणून पोहेकाँ कैलास मेसरे व अजीज सौदागर यांनी काम पाहिले.