शेगावच्‍या मानेगावचा तरुण अपघातात ठार, मित्र जखमी

 
दुचाकीस्वार बुलडाणेकरांनो जरा ही बातमी वाचा… त्‍या दुर्लक्षामुळे अपघात, युवक गंभीर जखमी; बुलडाणा तालुक्‍यातील घटना
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्‍यातील मानेगाव येथील २३ वर्षीय तरुण औरंगाबादमध्ये झालेल्या अपघातात जागीच ठार झाला. त्‍याचा मानेगावमधीलच मित्र जखमी झाला आहे. ही घटना औरंगाबादजवळील वाळूजच्या  ग्रीन गोल्ड कंपनीसमोर काल, १६ नोव्‍हेंबरला पहाटे घडली.

राजेश अरुण बघे (२३ रा. मानेगाव) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून, गजानन प्रल्हाद राहाटे (२७, रा. मानेगाव) जखमी झाला आहे. दोघे मित्र पुणे येथे राजेशचा मावसभाऊ मंगेश रतिये याच्‍याकडे गेले होते. येताना मंगेशची  मोटारसायकल (क्रमांक एमएच १२, एचजे २००१) घेऊन दोघे १५ नोव्‍हेंबरला सायंकाळी पुण्याकडून मानेगावकडे येण्यासाठी निघाले होते. पहाटे गजाननने लघुशंकेसाठी राजेशला मोटारसायकल थांबवायला सांगितली.

गजानन रस्त्याच्या कडेला गेला. तितक्यात मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (एमएच १४, जीयू ३२३१) एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्‍नात रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्या मोटारसायकला धडक दिली. मोटारसायकल व राजेशला दहा फुटांपर्यंत फरपटत नेले. यात  मोटारसायकलचे सायलेन्सर तुटून लघुशंका करणाऱ्या गजाननला उडून लागले. यात तोही किरकोळ जखमी झाला. वाळूज पोलिसांनी दोघांना रिक्षातून शासकीय रुग्णालयात नेले असताना डॉक्‍टरांना राजेशला तपासून मृत घोषित केले. कंटेनरचालकाविरुद्ध वाळूज पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.