प्रेमविवाह... इतका छळ झाला की तिने फास लावून घेतला!

मोताळा तालुक्‍यातील धक्कादायक घटना
 
 
hang

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रेमविवाह केलेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ९ नोव्हेंबरला लिहा बुद्रूक (ता. मोताळा) येथे घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पती, सासू, सासऱ्यांच्या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे त्‍यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पूनम रोशन चरवंडे (२१) हिने राहत्या घरात आत्महत्या केली होती. धामणगाव बढे पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. काल, १० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा विवाहितेचे भाऊ महेंद्रसिंग राजमलसिंग चव्हाण यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार पूनमने लिहा बुद्रूक येथील रोशन चरवंडे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून तिचा पती, सासू, सासरे व दीर शारीरिक व मानसिक छळ करत होते. हुंड्याचे २ लाख रुपये माहेरवरून घेऊन ये असे म्हणत तिला सतत मारहाण करण्यात येत होती. या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पूनमचा पती रोशन, सासरा गुलाब, सासू ज्योती आणि दीर दीपक व संदीप अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धामणगाव बढे पोलीस तपास करीत आहेत.