खामगावच्या लेकीचा नागपुरात सासरच्यांकडून छळ!

 
विवाहितेचा छळ
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चारित्र्याच्या संशयावरून २९ वर्षीय विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी पतीसह सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. मीना हरीश अंबेकर (२९, रा. हिंगणा रोड, नागपूर) ही विवाहिता छळाला कंटाळून सध्या माहेरी रोहणा (ता. खामगाव) येथे राहत आहे.

तिने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये नागपूर येथील हरीश अंबेकर याच्यासोबत तिचा विवाह झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. मीनाचे सासरे सीआरपीफमध्ये नोकरीला आहेत. लग्नानंतर सुरुवातीचे दोन वर्षे तिला चांगले वागविले. मात्र नंतर तू गावंढळ आहे, असे म्हणत सासू-सासरे व पती तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात येत होती, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये छळाला कंटाळून ती माहेरी आली होती. मात्र त्यानंतर दोन- अडीच महिन्यांनी पती तिला घ्यायला आला. यापुढे कोणताही त्रास होणार नाही, असा शब्द दिल्याने मीना पुन्हा सासरी गेली. मात्र त्यानंतरही सासरच्या लोकांच्या वागणुकीत कोणताही फरक पडला नाही.

२५ मे २०२१ रोजी मीनाचा नवरा दारू पिऊन घरी आला व चारित्र्यावर संशय घेऊन व पैशाच्या कारणासाठी मारहाण केली. सासू -सासऱ्यांना विनंती करूनही त्यांनी मदत केली नाही. उलट तिला वागवायचे नाही माहेरी पाठवून द्या, असे सासरा म्हणाल्याचे मीनाने तक्रारीत म्‍हटले आहे. मीनाचे काका व भाऊ तिला घ्यायला नागपूरला गेले तेव्हापासून मीना माहेरी रोहणा येथे राहत आहे. १६ नोव्हेंबर रोजी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मीनाचा पती हरीष गजानन अंबेकर, सासरा गजानन किसन अंबेकर व सासू कावेरी गजानन अंबेकर (सर्व रा. हिंगणा रोड, नागपूर)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.