जावईबापू हरवले होऽऽ...; खामगाव शहरातील घटना

 
File Photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोला माहेरी सोडून जावईबाप्पू गेले. पण घरी पोहोचलेच नाहीत. त्‍यामुळे सासरेबुवांनी खामगाव शहर पोलीस  ठाण्यात काल, ९ नोव्‍हेंबरला जावई हरवल्याची तक्रार दिली आहे. अनिल बाबुसिंग राठोड (३९, रा. हंसराजनगर, खामगाव) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

राठोड हे त्यांच्या पत्नीला घेऊन सासरवाडीत जयरामगड (ता. खामगाव) येथे गेले होते. ८ नोव्हेंबर रोजी पत्नीला माहेरी सोडल्यानंतर ते खामगावला परतले. काही वेळाने पत्नीने अनिल यांना फोन केला. मात्र फोन बंद येत होता. दिवसभर फोन बंद आल्याने शेजारी फोन करून बघितला असता स्‍कूटी व बॅग घेऊन ते ऑफिसला गेल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे अनिल यांची पत्नी व सासरे खामगावला आले. रात्रभर शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत. त्यामुळे सासऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून जावई हरविल्याची तक्रार दिली.

दहा दिवसांत १६ बेपत्ता
गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातून १६ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्‍तरी झाली आहे. यात आज, १० नोव्‍हेंबरला बुलडाणा शहरातील सोसायटी पेट्रोलपंप भागातील रहिवासी लता संजय गुजर या ३० वर्षीय गृहिणीसुद्धा घरातून निघून गेल्याची नोंद झाली आहे. याशिवाय सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील निकिता डिगांबर गायकवाड (सोनाळा पोलीस ठाणे), प्रेम देविदास निकम (३३, रा. वाकोडी, ता. मलकापूर, पोलीस ठाणे मलकापूर शहर), रविना अनिल सोळंके (१९, रा. चिंचखेड नाथ, ता. खामगाव, पोलीस ठाणे पिंपळगाव राजा), दिलीप मोहन इंगळे (२४, सामान्य रुग्‍णालय खामगाव, पोलीस ठाणे खामगाव शहर), शेख तालिब शेख लतिफ (३५, सैलानीनगर, चिखली, पोलीस ठाणे चिखली), सुमैयाबी शेख सलमान (२१, घरकुल मेहकर, पोलीस ठाणे मेहकर), दीपाली गबाजी लाड (१९, देऊळगाव राजा, पोलीस ठाणे देऊळगाव राजा), सौ. प्रतिभा राजकुमार इंगळे (३३, रा. पळशी खुर्द, ता. खामगाव, पोलीस ठाणे खामगाव ग्रामीण), पल्लवी संदीप बांगर (२६, रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद, पोलीस ठाणे जळगाव जामोद), सौ. लक्ष्मी संदीप वाकोडे (२८, रा. पळशी खुर्द, ता. खामगाव, पोलीस ठाणे खामगाव ग्रामीण), आरती रामदास बगे (१८, रा. पारखेड, ता. खामगाव, पोलीस ठाणे खामगाव ग्रामीण), विष्णू मुरलीधर पवार (३५, रा. लोणी गुरव, ता. खामगाव, पोलीस ठाणे खामगाव ग्रामीण), रवींद्र समाधान बिलघे (२०, रा. लोणार फाटा, ता. मेहकर, पोलीस ठाणे मेहकर), सौ. मयुरी रमेश खरपुडे (३२, रा. सागवान, रामनगर, बुलडाणा, पोलीस ठाणे बुलडाणा शहर) यांचा समावेश आहे.