बेजबाबदारपणे ट्रक रस्त्यात उभा केला, धडकून दुचाकीस्वार ठार!

चिखली तालुक्यातील घटना
 
दुचाकीस्वार बुलडाणेकरांनो जरा ही बातमी वाचा… त्‍या दुर्लक्षामुळे अपघात, युवक गंभीर जखमी; बुलडाणा तालुक्‍यातील घटना
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्यावर उभ्या ट्रकला दुचाकी धडकली. यात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. काल, १७ डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास चिखली- मेहकर रोडवरील मुंगसरी फाट्याजवळ हा अपघात घडला. शंकर तुकाराम काळे (३६, रा. माळीपेठ, मेहकर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

शंकर मोठ्या भावासोबत आचाऱ्याचे काम करत होता. १७ डिसेंबरला रात्री चिखली येथील त्यांचे मामा अर्जुन सखाराम कदम यांना भेटण्यासाठी तो दुचाकीने चिखलीकडे निघाला होता. मुंगसरी फाट्याजवळ  बिघाड झाल्यामुळे रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी मागून धडकली. यात शंकर जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. काल दुपारी शंकरचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर तुकाराम काळे (३८, रा. माळीपेठ, मेहकर) याच्या तक्रारीवरून एमएच ३७ वाय ८५६० क्रमांकाच्या ट्रकचालकाविरुद्ध बेजबाबदारपणे रस्त्यात ट्रक उभा करून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल चिखली पोलिसांनी गुन्हा केला आहे.