बुलडाण्यात ५ जण दीड लाखाने गंडले!

बनावट एटीएमच्या साह्याने ५ जणांच्या खात्यातून काढले पैसे
 
File Photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बनावट एटीएम कार्डच्या साह्याने दोन अनोळखी भामट्यांनी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढायला आलेल्या वेगवेगळ्या ५ जणांच्या खात्यातून तब्बल दीड लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात समाेर आली आहे.

काल, १ नोव्हेंबर रोजी लंकाबाई विलास चंडोल (रा. वडोद तांगडा, जि. भोकरदन, ह.मु. संत गाडगेनगर, चिखली रोड, बुलडाणा) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. लंकाबाईंचे पती बुलडाणा पोलीस विभागात कार्यरत होते. मात्र जूनमध्ये ब्रेन कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. एलआयसीचे अडीच लाख रुपये लंकाबाई यांच्या खात्यात जमा झाले होते. २८ ऑक्टोबर रोजी पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएममध्ये जाऊन अडीच हजार रुपये काढले. त्या पैसे काढत असताना अनोळखी व्यक्‍ती मध्ये मध्ये हस्तक्षेप करत होत्या. लकाबाईंचे एटीएम कार्ड मशीनमध्ये अडकले तेव्हा त्या अनोळखी व्‍यक्‍तींनी एटीएम कार्ड काढून देत लंकाबाईंच्या हातात दिले. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी खात्यातून १० हजार रुपये चार वेळा काढल्याचा मेसेज तक्रारदार महिलेला मोबाइलवर आला. त्यांचे एटीएम पर्समध्येच असल्याने त्यांनी बँकेत जाऊन याबाबत चौकशी केली असता दत्तनगर, लातूर येथील एटीएम सेंटरमधून ४० हजार रुपये काढल्याचा आणखी एक मेसेज आला.

२८ ऑक्टोबर रोजी ज्या अनोळखी व्‍यक्‍तींनी एटीएम कार्ड काढून दिले, त्यांनीच बनावट एटीएमद्वारे क्लोनिंग करून पैसे काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी छगन आत्माराम रिंढे (५९, तांदुळवाडी, ता. बुलडाणा) यांचे चाळीस हजार, सेवानिवृत्त कर्मचारी हरिदास लक्ष्मण चव्हाण (रा. गोडबोले लेआऊट बुलडाणा) यांचे वीस हजार, दिवालसिंग गोवर्धन धिरबस्ती (रा. तरोडा, ह. मु. जिजामातानगर बुलडाणा) यांच्‍या खात्यातून १२ हजार, दामोदर नामदेव सरकटे (रा. चांडक ले आऊट बुलडाणा) यांच्‍या खात्यातून ३४ हजार असे एकूण १ लाख ४६ हजार रुपये काढून भामट्यांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून दोन अनोळखी व्‍यक्‍तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे करीत आहेत.