अवैध दारूवर "उत्‍पादन शुल्क'ची वक्रदृष्टी कायम!

लोणार तालुक्‍यात कारमध्ये आढळली देशी!!
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतुकीविरोधात कारवाई हाती घेतली आहे. विभागाचे नागपूरचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १ ते २३ नोव्हेंबरदरम्यान धडक मोहीम राबविण्यात आली. यात ८२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ७३ वारस गुन्हे, ९ बेवारस गुन्हे नोंदवून ७३ आरोपींना अटक केली आहे. त्याचप्रमाणे देशी-विदेशी दारू, ५ वाहने असा एकूण १७ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धडक मोहिमेदरम्यान काल, २३ नोव्हेंबरला रांजणी शिवार (ता. लोणार) येथे  सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीच्या इंडिका कारला अडविण्यात आले. कारमध्ये ८६ देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या. ही कारवाई चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे यांच्या पथकाने केली. कारवाईत सहायक दुय्यम निरीक्षक जी. व्ही. पहाडे, जवान एस. डी. जाधव सहभागी होते. बुलडाण्याच्या भरारी पथकाचे निरीक्षक आर. आर. उरकुडे यांच्या पथकाने एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल हातभट्टी वाहतूक करताना जप्त केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक पी. व्ही. मुंगडे, जवान पी. ई. चव्हाण, एन. ए. देशमुख, आर. एस. कुसळकर, अमोल तिवाने सहभागी होते.

आपल्या परिसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागाच्या टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर 8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाच्या पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. ज्याप्रमाणे वाहन चालविताना वाहनांचा परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे मद्य बाळगताना, मद्य सेवन, मद्य वाहतूक करतानासुद्धा विभागाचा मद्यसेवन परवाना असणे बंधनकारक आहे. अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करताना अथवा मद्यविक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.