पतीने तिला शरीरसुख देण्यास दिला नकार!

नाव मोठे अन्‌ लक्षण खोटे...; शेगाव तालुक्‍यातील घटना
 
 
महिलेचा छळ

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नाव मोठे अन्‌ लक्षण खोटे अशी एक म्‍हण आहे. बडेजावपणा, पैसा, मोठ्या हुद्द्याची नोकरी पाहून मुलीकडचे भुलले अन्‌ मुलीचे अशा घरात लग्न लावून दिले. जिथे अगदी पहिल्या दिवसापासून तिचा छळ सुरू झाला. सासू, जेठाणी म्‍हणायच्या, तुला मूल होऊ देणार नाही अन्‌ तिच्या पतीने त्‍यांचे ऐकून चक्क तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. या सुखापासून तिला वंचित ठेवायला सुरुवात केली. एवढ्यावरच हे सासरचे मंडळी थांबले नाहीत. तिला नेसत्या वस्‍त्रानिशी घरातून हाकलून दिले. खामगाव शहरातील किसननगर येथील २५ वर्षीय विवाहितेची आपबिती आहे. शिवाजीनगर पोलिसांनी तिच्या ३० वर्षीय पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. सर्व संशयित खुमगाव बुटी (ता. नांदुरा) येथील असून, सध्या ते शेगाव शहरातील आकोट रोडवरील ज्ञानेश्वरीनगरात राहतात. त्‍यांच्‍याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे, की तिचे लग्न ३० मे २०२१ रोजी खामगाव शहरातील किसननगरात झाले. शेगाव येथे झालेल्या समाजाच्या राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलनातून हे स्‍थळ जुळले होते. मुलगा मुंबईत कॅप जेमेनी कंपनीत नाेकरीला आहे. साडेआठ लाख रुपये वार्षिक पॅकेज असल्याचे सांगण्यात आले होते. मुलगी एम.सी.ए. असल्याने तिलाही नोकरीला लावून देईन. कल्याण येथे फ्‍लॅट आहे. शेगाव व खुमगाव बुटी येथेसुध्दा दोन मजली मोठे घर आहे. मुलाकडच्यांच्या भारदस्त बोलण्याला मुलीवाले बळी पडल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यांनी साक्षगंधाच्या कार्यक्रमासही घाई केली होती. पण याच दिवशी विवाहितेच्या घरच्यांकडे कारची मागणी केली होती. मात्र परिस्‍थिती नसल्याने तिच्या वडिलांनी नकार दिला होता. लग्नात तिच्या पतीला एक सोन्याचा गोफ, एक सोन्याचे ब्रासलेट दिले. बऱ्याच मौल्यवान भेटवस्तू आंदण म्‍हणून तिला देण्यात आले. लग्न होताच नवरदेवासाठी तुम्ही नवीन कार विकत घेऊन द्या. १५ दिवसांत मागणी पूर्ण न केल्यास तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी मुलाकडच्यांनी दिल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी जेठाणीने तिला बेडरूममधील खासगी प्रश्न केले. तू आमच्यापासून कुठलीही तुमची दोघांमधील खासगी गोष्ट लपवू शकणार नाही. तू मुंबईला जाणे विसरून जा. नोकरी करणेही विसरून जा. तुला आम्ही केवळ सासू- सासऱ्याची व आमची सर्वांची सेवा करण्याकरिता दासी म्हणून आणले, असे जेठाणीने बजावले. त्‍यानंतर विवाहितेचे छळसत्र सुरू झाले. सासूही तिला धमकवायची. तुला येथे कोणतेही फॅशनेबल कपडे, सलवार-कुर्ता, गाऊन अशा प्रकारचे कपडे घालता येणार नाहीत. मी पाहते तू कशी टिकते... असे तीही धमकावत होती. सासू व जेठाणी तिला पतीसोबत बेडरूममध्ये एकत्र झोपण्याला विरोध करत होते. त्या दोघींचे तिचा पतीही ऐकत होता. पतीही तिला शारीरिक सुख देत नव्हता व ते सुख देण्यास स्पष्टपणे नकार देत होता. यामुळे विवाहितेच्या मनावर मोठा आघात झाला. वेळोवेळी अपमान करून वेळप्रसंगी मारहाण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आल्याचे विवाहितेने तक्रारीत म्‍हटले आहे. २८ जून २०२१ रोजी तिला नेसत्या वस्त्रानिशी माहेरी जाण्याकरिता घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे तिने तिच्या वडीलांना फोन केला व तिच्या भावाला शेगाव येथे बोलावून घेतले. तोपर्यंत तिला त्यांनी लाथाबुक्‍क्यांनी मारहाण करून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोहेकाँ श्री. वसतकार करत आहेत.