भीषण अपघात : ट्रकने तिघांना उडवले; दोघे जागीच ठार

टिप्परचे पंक्चर काढताना काळाचा घाला, एक गंभीर, देऊळगाव राजा तालुक्‍यातील घटना
 
file photo

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रस्त्याच्या बाजूला टिप्पर उभे करून पंक्‍चर काढत असताना मागून आलेल्या ट्रकने तिघांना उडवले. यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना चिखली- देऊळगाव राजा रस्त्यावरील देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील टेकाळे पंक्चरच्या दुकानासमोर आज, १३ नोव्‍हेंबरच्या पहाटे दीडच्या सुमारास (मध्यरात्री) घडली.

राजू कौतिकराव सुरडकर (३०, रा. भानखेड, ता. चिखली) व प्रसाद ठेंग (२६, रा. मकरध्वज खंडाळा, ता. चिखली) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. रवि पारुबा इंगळे (२८, रा. भानखेड) गंभीर जखमी झाला आहे. प्रसादचा रेती वाहतुकीचा व्यवसाय आहे. भानखेड येथील रवी हा टिप्परवर चालक तर राजू क्लिनर म्हणून कामाला होता.

मध्यरात्री त्यांचे टिप्पर पंक्चर झाल्याने देऊळगाव मही येथील टेकाळे यांच्या दुकानासमोर टिप्पर उभे करून टायर खोलण्याचे काम सुरू होते. प्रसाद हातात टॉर्च घेऊन उभा होता, तर दोघे टायर खोलण्याचे काम करत होते. त्याचवेळी चिखलीकडून देऊळगाव राजाकडे जाणाऱ्या ट्रकने तिघांना उडवले. यात प्रसाद व राजू ट्रकखाली चिरडले गेल्याने जागीच ठार झाले. जखमी रवी इंगळेला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला देऊळगाव राजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.