फोर व्‍हीलरला बनवले थ्री व्‍हीलर...

चोरट्यांची बघा ही करामत!; शेगाव शहरातील घटना
 
tye thief
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऐन दिवाळीत चोरटे जिल्ह्यात हैदोस घालत आहेत. शेगाव शहरात रस्त्याच्‍या बाजूला उभ्या तवेरा गाडीचे एक चाकच चोरट्यांनी खोलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. गाडीमालक सोहेलखान जमीलखान (५३, रा. बाजार फैल, शेगाव) यांनी काल, २ नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची तक्रार दिली आहे.
सोहेल खान हे पेंटर काम करतात. त्यांच्या मालकीची तवेरा गाडी त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी महात्मा फुले शाळेजवळ उभी करून ठेवली होती. १ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मुलाने गाडी बघितली असता त्यांना गाडीचे एक चाक गायब झाल्याचे दिसले. गाडीतील दोन स्पिकर, मॅटसह टायर असा एकूण ९५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. महात्मा फुले शाळेजवळ लावलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात १ चोरटा कैद झाला असून, शेगाव शहर पोलीस तपास करीत आहेत.