अखेर ॲड. इप्तेखारविरुद्ध गुन्हा दाखल; पत्रकाराला धमकी दिल्याचे प्रकरण

 
बुलडाणा शहर पोलीस ठाणे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वृत्त प्रसिद्ध करू नये म्‍हणून पत्रकाराला अश्लील शिविगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या मलकापूर येथील ॲड. इप्तेखारविरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मो. वसीम शेख अन्वर (३७, रा. मिर्झानगर, सालेहा अपार्टमेंट बुलडाणा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली होती. २३ डिसेंबरला मलकापूर एमआयडीसी परिसरात अवैधरित्या साठविलेल्या बायोडिझेलवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करून ६० हजार लिटर बायोडिझेल जप्त केले होते. गेल्या आठवड्यात मलकापूर तहसीलदारांना मो. वसीम यांनी फोन करून जप्त केलेल्या बायोडिझेलबाबत काय कारवाई करण्यात आली आहे, अशी चौकशी केली होती.

त्‍यावर बायोडिझेलचे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविले असून, अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली होती. त्‍यानंतर ६ जानेवारीला दुपारी वसीम यांना कॉल आला. वकील इप्तेखार बोलतोय. तुम्ही पत्रकार वसीम शेख बोलता का? मी वकील आहे तुम्ही माझ्या बायोडिझेल पंपाबाबत तहसीलदारांना का विचारपूस करत आहात... तुझ्यामुळे माझा बायोडिझलचा पंप बंद झाला... मी वकील आहे... काळे कागज करायला काही लागत नाही. तुझे हातपाय तोडीन, अशी धमकी कॉलवरून देण्यात आली. अश्लील शिविगाळही करण्यात आली. त्‍यामुळे वसीम यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी ॲड. इप्तेखारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम करत आहेत.