वृद्धाची भाड्याच्या घरात आत्महत्या

खामगाव तालुक्यातील घटना
 
 
गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या; नांदुरा तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ६५ वर्षीय वृद्धाने भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास सुटाळा बुद्रूक (ता. खामगाव) येथे समोर आली. भीमराव रामकृष्ण दाभाडे असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

दाभाडे हे पत्नी कुसुमबाईंसोबत सुटाळा फाटा येथे भाड्याने खोली करून राहत. त्यांचा मुलगा विशाल याला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो आई- वडिलांपासून वेगळा खामगाव शहरात राहतो. काल दुपारी दोनच्या सुमारास भीमराव दाभाडे यांनी घरातील लाकडी बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी बाहेरून आली असता दरवाजा वाजवूनही  प्रतिसाद न मिळाल्याने त्‍यांनी घरमालक आशिष भोपळे यांना बोलावले. त्‍यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता त्यांना दाभाडे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. घरमालक आशिष भोपळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बद्रीनाथ जायभाये करीत आहेत. दाभाडे यांच्या आत्‍महत्‍येचे कारण समोर आलेले नाही.